‘शैक्षणिक विकासाकरिता सर्वसमावेशक अभ्यास कौशल्ये’
लेखिका - डॉ. सरोज उपासनी
लेखिका - डॉ. सरोज उपासनी
(#Enhancement of Study Skills Among Students या पुस्तकाची मराठी रुपांतरीत आवृत्ती)
ISBN : 978-81-937448-2-6
अभ्यास
करणे हे ज्ञानतृप्तीचे साधन आहे! अभ्यासामुळे,
ज्ञानसंपादनामुळे जसे आत्मिक समाधान लाभते, तसेच आसपासच्या व्यावहारिक जगात
सक्षमतेने जगण्यासाठी व्यक्तीची अभ्यासवृत्ती व त्याद्वारे मिळविलेले चौफेर ज्ञान
लाभदायी ठरते. सुशिक्षित होणे ही नाण्याची एक बाजू असली तर अभ्यास ही दुसरी बाजू
म्हणता येईल. अभ्यासूवृत्ती ही प्रत्येकच व्यक्तीला आयुष्यभर उपयुक्त असली तरी
विशेषत: विद्यार्थीदशेत ही अभ्यासूवृत्ती विद्यार्थ्याला त्याचे शैक्षणिक ध्येय
प्राप्त करण्यास अधिकच उपयोगी ठरते.
विद्यार्थ्याने
आपले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ अभ्यास करणे पुरेसे नसून, तो अभ्यास
अधिक नीटनेटका, आकलनपूर्ण होणे गरजेचे असते. त्याकरिताच विद्यार्थ्याला अभ्यास कौशल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये व
त्यापुढीलही शैक्षणिक जीवनात विशिष्ट अभ्यासक्रम शिकविला जातो, मात्र तो अभ्यास
कौशल्यपूर्णतेने कसा करावा? हे मात्र बहुदा
शिकविले जात नाही. विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून शिक्षणक्षेत्रात प्रदीर्घ योगदान
दिलेल्या डॉ. सरोज उपासनी यांनी इंग्रजीत Enhancement of Study
Skills Among Students या पुस्तकाचे व
मराठी वाचकांच्या मागणीनुसार त्याचेच ‘शैक्षणिक
विकासाकरिता सर्वसमावेशक अभ्यास कौशल्ये’ या नावाने मराठीत
रुपांतरीत पुस्तकाचे लेखन केले आहे. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांनाच उपयुक्त नसून
शिक्षणप्रक्रियेचे चारही स्तंभ; म्हणजेच
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच महत्वपूर्ण ठरेल असा
विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.
या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रथम लोकार्पण महाराष्ट्रातील प्रसिध्द
शिक्षणतज्ञ व नाशिकचे गौरवस्थान, शिक्षणप्रेमींचे प्रेरणास्थान, एक अभ्यासू व
ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व अर्थातच गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सर डॉ.
मो.स. गोसावी यांचे हस्ते 19 जुलै, 2018 रोजी करण्यात आले होते. या पुस्तकाला
लाभलेला अभ्यासू वाचकांचा प्रतिसाद बघून नाशिक येथील ‘संयोग प्रकाशनाने’ इंग्रजी व मराठी अशा दोनही आवृत्त्यांचे प्रकाशन केलेले
आहे.
सदर
पुस्तकात लेखिकेने विविध अध्ययन कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन केलेले आहे.
विद्यार्थी अध्ययन कसे करतो? परिणामकारक
अध्ययनासाठी विद्यार्थ्यात कोणकोणत्या पात्रता असाव्या लागतात? अध्ययनाची अर्थात अभ्यासाची प्रक्रिया कशी असते? अभ्यास कौशल्यांचा विकास कसा साधावा? अभ्यासात नैपूण्य वाढविणारे घटक, मानसिकता व दृष्टिकोन तसेच
इतर गुणवैशिष्ट्ये, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक प्रक्रिया करतांना
करावयाच्या व टाळावयाच्या बाबी, शिक्षकांचे अध्यापन सुरू असतांना विद्यार्थ्यांनी परिणामकारक
नोंदी कशा घ्याव्यात? आकलनशक्ती कशी वाढविता येईल? अध्ययनसाहित्याचे वाचन करतांना नोंदी कशा ठेवाव्यात?, लिहिण्याची कला-कौशल्ये, अभ्यासातील एकाग्रता, निरीक्षणाची कला, ऐकण्याची
कला, परीक्षेकरिता प्रभावी उजळणी कशी करावी? स्मृती सुधारणा
तंत्रे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे व संबंधित गोष्टींचे मार्गदर्शन या
पुस्तकातून मिळते. यासोबतच आरोग्य व शिक्षण यांचा संबंध, कार्यशक्ती व वेळ यांचे
व्यवस्थापन, अभ्यास व प्रेरणा, प्रस्तुतीकरण अर्थात शैक्षणिक सादरीकरणाची कला,
संभाषण कला, गटचर्चा करण्याची कला, शिस्तपालनाचे महत्व, मानवी संबंध जपण्याची कला
अशा विद्यार्थ्याला शैक्षणिक उपलब्धीच्या दिशेने नेणाऱ्या विविध गोष्टींची
अभ्यासपूर्ण चर्चा देखील या पुस्तकात करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने
व प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपल्या संग्रही ठेवावे, असेच हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या
लेखिकेबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, डॉ. सरोज उपासनी यांनी तब्बल 50 वर्षे
शैक्षणिक क्षेत्रास आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. उपासनी यांनी आपले शालेय
शिक्षण पूर्ण करुन नर्सिंग ह्या व्यवसायात पदार्पण केले. सुरूवातीला नर्सिंग
डिप्लोमा, पुढे पोस्ट बेसीक बी.एस्सी. नर्सिंग डिग्री मुंबई विद्यापिठातून प्राप्त
केली. मास्टर्स इन नर्सिंग (1986-88), आणि पीएच.डी (2005) ‘सार्वजनिक आरोग्य परिचर्या’ या विषयात
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथून प्राप्त केली. याव्यतिरिक्त
समाजशास्त्र या विषयात 1975 मध्ये बी.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी परिचर्या
शिक्षण संस्था मुंबई, जे.जे. हॉस्पिटल येथे 1978 ते 2007 पर्यंत ट्युटर,
अध्यापिका, प्राध्यापिका अशा विविध पदांवरुन विद्यादानाचे कार्य केले. याचसोबत
इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठातील बी.एस्सी. नर्सिंग डिग्रीसाठी निरंतर
अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणूनही योगदान दिले. 2007 मध्ये शासकीय पदावरील
निवृत्तीनंतर कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये नवीन नर्सिंग कॉलेज स्थापनेत व तेथील
प्रशासनात 2008 ते 2015 पर्यंत प्राचार्या म्हणून योगदान दिले. त्यानंतर एक वर्ष
प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या लोणी येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्या म्हणून काम
पाहिले व 2016 पासून आजपावेतो नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग
कॉलेजमध्ये त्या उपप्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील चार नामवंत
विद्यापिठांसोबत त्या पीएच.डी. गाईड म्हणून संलग्न असून 5 विद्यार्थ्यांनी
त्यांच्या मार्गदर्शनाने पीएच.डी. प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ नाशिक येथे अभ्यास मंडळ अध्यक्ष, अकॅडमिक कौन्सील सदस्य, संशोधन मंडळ
सदस्य, संशोधन पत्रिका सदस्य ही पदे त्यांनी भूषविली आहेत. व्यावसायिक परिचारिकांच्या
अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी तज्ञ प्रशिक्षक म्हणून योगदान दिलेले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नर्सिंग विषयाकरिता समन्वयक
म्हणून देखील डॉ. उपासनी सध्या आपले योगदान देत आहेत. तसेच महाराष्ट्र मराठी
साहित्य परिषदेच्या सदस्य या पदावर देखील त्या कार्यरत आहेत.
अशा
ज्ञानसंपन्न व कार्यनिष्ठ लेखिकेने आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना व शिक्षक
बांधवांना समर्पित केलेले हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक व शैक्षणिक उद्दिष्टे साध्य
करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
डॉ.
सरोज उपासनी यांचेकडून असेच शैक्षणिक कार्य समाज उन्नतीच्या दिशेने घडत राहो व
याकरिता त्यांना सुसंपन्न आरोग्य लाभो अशा सस्नेह सदिच्छा!
-
डॉ. योगेश वानखेडे
संचालक – संयोग पब्लिकेशन, नाशिक
संचालक – माईंडसर्च कौन्सेलिंग, नाशिक
संचालक – माईंडसर्च कौन्सेलिंग, नाशिक
संपर्क :
9881168509
#sanyog publication